एक व्यक्ती रोज सकाळी उठताक्षणीच जेव्हा ताजतवानं होण्यासाठी दरवाजातून बाहेर पडायचा . तेव्हा त्याच स्वागत दररोजच्या प्रमाणे आजूबाजूच्या दोन-तीन झाडांच्या पानांच्या सड्याने व्हायचा. त्याला तो पानांचा सडा बघून झाडांचा राग यायचा. त्याला त्या पानांचा सड्याचा कंटाळा आलेला होता. त्याला रोज कार्यालयात जाण्याआधी घरासमोरील अंगण झाडून स्वच्छ करायला लागायचे आणि कार्यलयातून आल्यावर नित्याप्रमाणे घराचे अंगण झाडावे लागायचे.
असा त्याचा नित्यक्रम चालायचा. नाहक त्याला त्याच अंगण रोज झाडायला लागायचे याचा त्याला वैताग आलेला होता. त्याची झाडाबद्दल मनात चीड आली होती.
एक दिवस जेव्हा तो सकाळी उठतो सर्व आवरून कार्यालयाला निघतो. तेव्हा त्याला निदर्शनास येते कि झाडांना कापायला मजूर आलेले बघतो . त्याला मनातून अत्यंत आनंद होतो कारण त्याला आता रोजचा त्रास सहन करावा लागणार नव्हता. तो संध्याकाळी घरी येतो तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेली झाड कापलेली दिसतात व त्याच्या घरासमोरही कोणत्याही प्रकारचा पानांचा सडा नसतो. आपण जिंकल्याचा त्याला आभास होतो आणि तो आनंदाने घरात शिरतो.
नंतरच्या दिवशी सकाळी उठल्यावर कोणत्याही प्रकारचा पान त्याला अंगणात दिसत नाही अन झाडही तोडलेले असते. तो आनंदातच कार्यालयात जातो. दुपारी कार्यालयाच्या एअर कंडिशनिंग खोलीतून बाहेर येतो व रस्त्याने चालायला लागतो. भर दुपारची वेळ सूर्य माथ्यावर आला असल्याने उन्हाचे चटके त्याला बसतात. उन्हाची तीव्रता वाढतच असल्याने त्याला तिथे सावलीचा सुद्धा अभाव जाणवतो व त्याला झाडाच्या सावलीची मनात तळमळ होते. पण ज्या रस्त्याने तो चालत असतो त्या रस्त्याच्या दुतर्फा त्याला फक्त काँक्रेटच्या व काचेच्या भल्या उंचच उंच इमारती दिसतात. तो उन्हाच्या तापाने घामाघूम झालेला असतो . तो सावलीचा शोधाशोध करायला लागतो त्याला थोड्याश्या सावलीची आस असते पण तिथे फक्त त्याला गगनाला भिडलेल्या इमारती दिसत असतात. तो झाडाच्या शोधात धावपळ करायला लागतो. तो सैरभैर पळत सुटतो. जिकडेतिकडे फक्त सिमेंटच्या इमारती याने त्याला ग्लानी येते. एका ठिकाणी पळताना त्याला बाग असल्याची भास होते तो तेथे आत शिरतो. तिथे त्याला झाड दिसतात पण तेही सिमेंटचेच. चहुबाजूनी त्याला फक्त सिमेंटचेच पाने अन फुले दिसतात. उन्हात घामाघूम झाल्याने आणि पळून थकल्याने व हवेच्या कमतरतेमुळे त्याचा जीव गुदमरू लागतो व तो बेशुद्ध होऊन पडतो.
भीतीने घाबरुन घामाघूम झालेला तो बिछान्यावरून ताडकन उठून बसतो. चेहऱ्यावरचा घाम पुसतच पळत दरवाजा उघडून बघतो. पण त्याला तिथे त्याचे रोजचे सोबती पानांचा सडा दिसत नाही. त्या पानांचा स्पर्श त्याने आता हरवलेला असतो. व त्याला त्याच दुःख मनाला बोचत असत. झाड व त्याच्यामध्ये तोच हरला याची त्याला जाणीव होते आणि त्याचा मनाचा बांध फुटतोच. तो स्वतःला सावरत आंनदाने चमकून ताड्कन उठतो व सायकल बाहेर काढून थेट झाडांची रोपटे घेऊन येतो. घराच्या अंगणातील फरश्या बाहेर काढून तेथे झाडाचे आणि फुलांचे रोपटे लावतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असतो. दोन-तीन रोपटे तो त्या झाड कपणाऱ्या मजुरालाही लावायला मदत करतो. व रोपटे लावून निघतो. निघताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाचे तेज व जिंकल्याचा भाव सहज व्यक्त होत असतो. नकळतच तो आज झाडे लावून जगातला श्रीमंत माणूस झाला होता.